pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
मिलिंद जोशी
06 जुन 2017

 

Image may contain: 1 person, smiling, sunglasses and closeup

मिलिंद भरत जोशी

 

 

नाव : 

मिलिंद भरत जोशी

 

जन्म तारीख : 

१५ ऑगस्ट १९७५

 

नागरिकतत्व : 

भारतीय

 

शिक्षण : 

बी.कॉम., एम.पी.एम.

 

स्वभाव / आपणास काय वाटते आपण कसे आहात : 

माझ्याबद्दल मी काही सांगण्यापेक्षा जे माझ्या संपर्कात असतात ते जास्त चांगले सांगू शकतील.

 

छंद, ज्याला आपण थांबवू शकत नाही : 

खरे तर असे कोणतेच छंद म्हणता येणार नाहीत. बाकी आवड म्हणालात तर क्रिकेट खेळायला आवडते. पुस्तके वाचायला आवडतात आणि हिंडायला आवडते. तेही दुचाकीवर...

 

आवडती व्यक्ति : 

माझी आई आणि आता माझी बहिण आणि भाच्या.

 

आवडते व्यसन : 

फेसबुक

 

ह्या क्षेत्रात आपला आदर्श कोण आहे? : 

अनेक जण आहेत.. पण त्यातल्या त्यात व.पु,काळे हे माझे आदर्श आहेत.

 

आवडता पेहराव : 

जीन्स टीशर्ट

  

आवडते भोजन / जेवण : 

पावभाजी, ढोकळा, इडली ( या सगळ्या गोष्टी लोकांसाठी नाश्ता असतात, पण माझ्यासाठी जेवण )

  

राजकीय मत : 

प्रत्येक पक्षात काही ना काही चांगल्या गोष्टी आहेत. पण ज्यावेळेस मी मतदान करतो त्यावेळेस मी परिस्थितीनुसार आपला निर्णय घेतो.

 

प्रचंड कामांमुळे आपण कधी तानावाखाली येता का ? : 

आधी खूप वेळेस असे घडायचे. आता त्यात मीच बराचसा बदल केला आहे. आजकाल मी कोणत्याच गोष्टीची जास्त काळजी करत नाही. आपण फक्त प्रयत्न करायचे... बस...

  

प्रेम काय आहे ? : 

माझ्या मते प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. ही भावना अनेकदा माणसाला खूप चांगले वागण्याची प्रेरणा देते. पण शेवटी अति तिथे माती ही उक्ती प्रेमालाही लागू होते.

 

तुम्ही सर्वात जास्त आनंदी कधी होता ? : 

अनेक गोष्टींमुळे मी आनंदी होत असतो. बहुतेक देवाने मला कायम स्वरूपी आनंदी राहण्यासाठीच या दुनियेत पाठवले असावे असे मला कधी कधी वाटते. सर्वात जास्त आनंदी मी जेंव्हा लहान मुलांमध्ये लहान होऊन खेळतो त्यावेळेस होतो. 

 

तुमच्या बालपणातील अविस्मरणीय क्षण कोणता? : 

तशा खूपच घटना अशा आहेत ज्या माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्यातील एक घटना सांगायची झाली तर मी १०/१२ वर्षांचा असेल. त्यावेळेस माझे आई वडील बाहेरगावी गेले होते. घरी मी आणि माझा लहान भाऊ दोघेच होतो. त्यांना येण्यास उशीर लागला म्हणून मी आईला मदत म्हणून मोदकांसाठी कणिक मळून ठेवायचे ठरवले. पण ती कशी मळतात हे नीटसे माहिती नसल्यामुळे व्यवस्थित मळली गेली तर नाहीच पण खूप जास्त होऊन बसली. मी वैतागलो तर होतोच... पण घाबरलोही होतो. आता आपले बोलणे चुकत नाहीत हे मनाशी पक्के केले. आणि तेवढ्यात माझे आईवडील आले. त्यांनी माझे कणिकेचे भरलेले हात आणि परातीत अर्धवट मळलेली कणिक पाहिली आणि आधी डोक्याला हात लावून घेतला. मी अधिकच घाबरलो. आणि मग दोघेही हसायला लागले. त्यानंतर आईने ती सगळी कणिक मळली. असे अनेक उपद्व्याप मी करायचो. आईचे, वडिलांचे काम वाढवून ठेवायचो. पण त्यांनी प्रत्येक वेळेस माझ्या कृतीमागील भावनाच फक्त पाहिली. आणि त्या सगळ्या गोष्टी मला प्रकर्षाने शिकवल्या.   

 

तुमच्या स्वतःच्या संग्रहालयात किती पुस्तके आहेत? : 

जवळपास १०० पेक्षा जास्त असतील. त्यातील २०/२५ पुस्तके धार्मिक आहेत. आईसाठी घेतलेली. काही सामाजिक आहेत. आणि बाकी इतर सगळी पुस्तके कथा / कादंबरी आणि कविता संग्रह आहेत.

 

जर तुमची एक चोरी क्षम्य केली तर तुम्हाला काय चोरायला आवडेल? : 

मला व. पु. काळे यांचे लेखन कौशल्य चोरायला आवडेल. 

 

देवाला मानता का? केव्हा? : 

हो... मी देवाला मानतो. मी पूर्ण आस्तिक माणूस आहे. देव आपल्याला प्रत्येक वेळेस वाट दाखविण्याचे काम करतो पण बऱ्याच वेळेस आपण आपल्या स्वार्थाचा विचार करून निर्णय घेतो आणि तिथेच फसतो.

 

आपणास कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते? : 

मला इंग्लिशमध्ये संभाषण करण्याची सगळ्यात जास्त भीती वाटते.

 

आयुष्यात तुमच्या अपेक्षा काय आहेत? : 

जेंव्हा मी ह्या जगाचा निरोप घेईल त्यावेळेस लोकांच्या डोळ्यात माझ्यासाठी दोन आसवे असावीत इतकीच माफक अपेक्षा आहे. पण त्यासाठी मलाच माझे आचरण शुध्द आणि सात्विक ठेवावे लागणार हेही मी जाणून आहे.

 

आपण एखाद्या भावुक प्रसंगाला सामोरे गेल्यावर कधी रडला होता? : 

खरे तर मी खूप विचित्र माणूस आहे. खऱ्या जीवनात आई गेली त्यावेळेसही माझ्या डोळ्यात पाणी नव्हते. आणि जेंव्हा चित्रपट पहात असतो त्यावेळेस त्यातील अगदी साधा प्रसंग देखील माझे डोळे भरून येण्यास पुरेसा असतो.

 

तुमची आवडती पाच पुस्तके : 

एका जनार्दनी – रवींद्र भट, आमचा बाप आन आम्ही – नरेंद्र जाधव, अधःपात – गो. ना. दातारशास्त्री, संभाजी – विश्वास पाटील, इंद्रायणी काठी – रवींद्र भट. बाकी इतर मध्ये वपूचे कथाकथन, गुरुनाथ नाईकांच्या झुंजार कथा आपल्याला जाम आवडतात.  

 

साहित्य क्षेत्रातील आपले स्वप्न काय आहे? : 

किमान एक हजार लोकांना मी एक लेखक आहे इतके जरी माहित असले तरी ते माझ्यासाठी पुरेसे आहे. 

 

तुमच्या वाचकांना संदेश : 

वाचकांना मी काय संदेश देणार? कोणत्याही लेखकाला सगळ्यात जास्त गरज असते ती वाचकांच्या अभिप्रायाची. त्यांच्या अभिप्रायातूनच लेखकाचे लेखन समृद्ध होत असते. त्यामुळे माझा सगळ्या वाचकांना हाच संदेश असेल की माझ्या सारख्या नवोदितांना जास्तीत जास्त आपले अभिप्राय द्यावेत. मग ते प्रोत्साहन देणारे असोत व टीका करणारे...   

 

प्रतिलिपी.कॉम बद्दल २ शब्द ... ? : 

प्रतिलिपी बद्दल मी काही बोलणे म्हणजे काजव्याने सूर्याची स्तुती करण्यासारखे आहे. नवोदितांसाठी प्रतिलिपीने उपलब्ध करून दिलेला हा मंच साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरत आहे यात काहीच दुमत असण्याचे कारण नाही. 

 

खूप खूप धन्यवाद...