pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सी ई ओ कडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

30 दिसम्बर 2025

नमस्कार,

मी रणजित बोलतोय.

तुम्ही आणि मी, आपण कदाचित कधीच प्रत्यक्षात भेटलो नसू, पण तुमच्या कथांमुळे आपण एका अतूट धाग्याने जोडले गेलो आहोत. खूप दिवसांपासून तुमच्यासोबत संवाद साधायचा होता. आज मी हे पत्र सी ई ओ म्हणून किंवा संस्थापक म्हणून नाही, तर एका माणसाच्या नात्याने लिहितोय ज्याची स्वप्नं, ध्येय आणि दृष्टी तुमच्यामुळेच जिवंत राहिली आहेत.

माझं एक साधं स्वप्न होतं, एक असा प्लॅटफॉर्म उभारण्याचं जिथे कोणताही कथाकार भाषा, तंत्रज्ञान किंवा भौगोलिक मर्यादा न ठेवता आपली कथा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकेल.

मला आजही आठवतं, बंगळुरूमधल्या एका छोट्याशा फ्लॅटमध्ये पाच जणांनी मिळून प्रतिलिपिची सुरुवात केली होती. आमच्याकडे साधनं कमी होती, जगासाठी आम्ही अगदीच अज्ञात होतो. पण मग तुम्ही आलात आमचे लेखक.

तुम्ही तुमच्या कथा, त्यातली पात्रं, तुमचं मन आणि तुमचा आत्मा अशा प्लॅटफॉर्मवर आणला, जो अजून चालायलाच शिकत होता.

गेल्या 11 वर्षांत आमच्या प्रवासात असंख्य कठीण प्रसंग आले. अनेकदा वाटायचे हा मार्ग अशक्य आहे. पण प्रत्येक वेळी हार मानावीशी वाटली, व्हा मी प्रतिलिपि ॲप उघडून तुमच्यापैकी एखाद्या लेखकाने प्रकाशित केलेली नवीन कथा वाचत होतो. तुम्ही आम्हाला तुमच्या कथेतून फक्त प्रेरणाच दिली नाहीत, तर तुम्ही आम्हाला आशा दिलीत. एका कल्पनेला तुम्ही स्टार्टअप बनवलंत आणि त्या स्टार्टअपला कुटुंब.

हे एक असं कुटुंब आहे ज्यात इंजिनिअर्स आहेत, प्रॉडक्ट मॅनेजर्स आहेत, ऑथर रिलेशनशिप मॅनेजर्स आहेत, वकील आहेत आणि अजूनही बरेच लोक आहेत... पण सर्वात महत्त्वाचे तुम्ही आहात - आमचे निर्माते! कारण तुमच्यामुळेच या सगळ्याला अर्थ प्राप्त होतो.

नवीन वर्षात प्रवेश करताना, मी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. कारण आज आम्ही जिथे आहोत, ते केवळ तुमच्यामुळेच आणि भविष्यात अजून खूप पुढे जाण्याचं स्वप्नही आम्ही फक्त तुमच्यामुळेच पाहू शकतो.

माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तिने तुमच्या लेखणीला सत्याची आणि बुद्धीला ज्ञानाची जोड द्यावी. 2026  हे वर्ष असं असो, जिथे तुमची कल्पनाशक्ती एखाद्या अखंड नदीसारखी वाहत राहील. तुमच्या कथांच्या जगातून तुम्ही वाचकांचं आयुष्य असेच समृद्ध करत राहाल, अशी माझी मनापासून इच्छा आहे.

आमचं मिशन तर आता कुठे सुरू झालं आहे! आम्हाला अशी कंपनी बनवायची आहे जी पिढ्यानपिढ्या लक्षात राहील. माझं एक वैयक्तिक आणि मनापासूनचं स्वप्न अगदी साधं आहे: मला असं जग बघायचं आहे जिथे एका लेखकाला दुसरी नोकरी करण्याची गरज पडणार नाही आणि प्रतिलिपिवरची कमाईच त्यांच्या कुटुंबाचा आधार बनेल.

तुमचे लेखनच तुमचं आयुष्य चालवेल, असा भविष्यकाळ मला घडवायचा आहे. प्रतिलिपिवरील तुमची कमाई तुम्हाला ती मोकळीक देईल ज्याच्यासाठी तुम्ही जन्माला आला आहात.

आम्ही परिपूर्ण नाही, हे मला मान्य आहे  पण मी तुम्हाला खात्री देतो, तुमचं कौतुक असो किंवा सूचना, टीका-टिप्पण्या त्या ऐकण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. हे व्यासपीठ अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तुमच्या विश्वासास पात्र बनवण्यासाठी आम्ही दररोज काम करत आहोत. आमचं लेखक कुटुंब हेच आमचं अस्तित्व आहे. प्रतिलिपि आहे कारण तुम्ही आहात!

तुमचा प्रवास तुम्हाला आमच्याशी शेअर करायचा असेल किंवा आम्ही अजून चांगलं काम कसे करू शकतो हे सांगायचं असेल, तर नक्की मला थेट [email protected] वर संपर्क साधू शकता. मी योग्य व्यक्ती नसलो, तरी तुमचा संदेश योग्य टीमपर्यंत नक्की पोहोचवेन.

तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या सर्व प्रियजनांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा!

प्रतिलिपिला घडवण्यात आमची साथ दिल्याबद्दल धन्यवाद. 

कृतज्ञतेसह,
रणजित प्रताप सिंह
संस्थापक, प्रतिलिपि