प्रिय लेखक,
१०० पेक्षा जास्त भागांची सिरीज लिहिणे सुरुवातीला कदाचित कठीण वाटू शकते, पण जर तुम्ही त्याचे नियोजन छोट्या-छोट्या टप्प्यांत केले, तर हे काम अगदी सोपे होईल. एका मोठ्या सिरीजमध्ये वाचकांना प्रदीर्घ काळ खिळवून ठेवण्यासाठी उत्कट भावना, पात्रांचा स्पष्ट प्रवास, नियमित येणारे ट्विस्ट आणि पुरेसा कथा विस्तार असणे आवश्यक आहे. तुमच्या पहिल्या १००+ भागांच्या मोठ्या सिरीजचे अचूक नियोजन करण्यासाठी येथे काही सोपे उपाय दिले आहेत.
- 1
एका भक्कम कथेच्या कल्पनेने सुरुवात करा.
अशी कल्पना निवडा ज्यामध्ये अनेक भागांपर्यंत पुढे नेण्यासाठी पुरेशा भावना आणि खोली असेल. नातेसंबंध, रहस्ये, कौटुंबिक नाट्य, शत्रुत्व किंवा भावनिक संघर्ष असणाऱ्या कथा एका मोठ्या सिरीजच्या रूपात नैसर्गिकरित्या विकसित होऊ शकतात.
- 2
कथेला मोठ्या टप्प्यांत विभागून घ्या.
सुरुवातीलाच संपूर्ण १०० भागांचा एकत्र विचार करू नका. कथेची विभागणी परिचय, नातेसंबंधांची गुंफण, संघर्ष, एखादा मोठा ट्विस्ट, भावनिक पडझड, सावरणं आणि क्लायमॅक्स (कथेचा शेवट) अशा वेगवेगळ्या टप्प्यांत करा.
- 3
पात्रांचा प्रवास प्रभावी बनवा.
वाचक कथेतील प्रसंगांपेक्षा पात्रांशी जास्त जोडले जातात. म्हणूनच तुमच्या मुख्य पात्रांचे ध्येय, त्यांच्या भीती, त्रुटी, भावनिक जखमा आणि संपूर्ण सिरीजमध्ये होणारा त्यांचा बदल किंवा प्रगती वाचकांना स्पष्टपणे दिसू द्या.
- 4
मोठे ट्विस्ट आधीच ठरवून ठेवा.
लेखन सुरू करण्यापूर्वी कथेतील काही महत्त्वाचे वळण निश्चित करा. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी योग्य अंतराने विश्वासघात, लपलेली सत्ये, विरह, पुनर्मिलन, समोरासमोर येणारे प्रसंग आणि विजय या गोष्टी कथेत येत राहिल्या पाहिजेत.
- 5
५ ते १० भागांच्या गटात नियोजन करा.
सर्व १०० भागांचे नियोजन एकत्र करण्याऐवजी ५ ते १० भागांचे छोटे-छोटे गट तयार करून प्लॅनिंग करा. प्रत्येक गटात एखादी समस्या समोर आली पाहिजे, त्यातून ताण निर्माण झाला पाहिजे आणि शेवटी वाचकांची उत्सुकता वाढवणारा किंवा भावनिक समाधान देणारा शेवट झाला पाहिजे.
- 6
पहिले १५ ते २० भाग अतिशय खिळवून ठेवणारे बनवा.
आपल्याला ही कथा पुढे वाचायची आहे की नाही, याचा निर्णय वाचक अगदी सुरुवातीलाच घेतात. त्यामुळे कथेच्या सुरुवातीच्या भागांमध्ये दमदार सुरुवात, भावनिक ताणतणाव, नातेसंबंधांमधील संघर्ष, उत्कंठावर्धक वळणे (क्लिफहॅंगर्स) आणि कथेचा वेगवान प्रवास असणे गरजेचे आहे.
- 7
उपकथांचा विचारपूर्वक वापर करा.
उपकथा (Subplots) तुमच्या मोठ्या सिरीजला अधिक समृद्ध आणि जिवंत बनवू शकतात. मैत्री, कौटुंबिक अडचणी, प्रतिस्पर्धी, सण-उत्सव, बाजूची रहस्ये किंवा दुय्यम पात्रांचा वापर केवळ तेव्हाच करा जेव्हा ते तुमच्या मुख्य कथेला पुढे नेण्यासाठी मदत करत असतील.
- 8
विनाकारण कथा ओढणारे भाग टाळा.
सिरीजमधील प्रत्येक भागाचा एक स्पष्ट उद्देश असायला हवा. तो भाग कथेला पुढे नेणारा, भावना अधिक गडद करणारा, नवीन माहिती समोर आणणारा, संघर्ष वाढवणारा, पात्रांचा विकास करणारा किंवा वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा असावा.
- 9
नोट्स आणि कथेतील सुसूत्रता टिकवून ठेवा.
मोठ्या सिरीजचा योग्य मागोवा घेणे खूप गरजेचे असते. कथेचा घटनाक्रम, नातेसंबंध, भूतकाळातील घटना, भविष्यातील ट्विस्ट आणि पात्रांचे तपशील यांसाठी सोप्या नोट्स तयार ठेवा, जेणेकरून तुमची कथा कुठेही भरकटणार नाही आणि स्पष्ट राहील.
- 10
कथेचा भावनिक शेवट माहीत असू द्या.
तुम्हाला सुरुवातीपासूनच प्रत्येक बारकाव्याचे नियोजन करण्याची गरज नाही. परंतु, कथेचा भावनिक शेवट काय असणार आहे हे आधीच माहीत असल्यास, कथा विनाकारण रेंगाळत नाही आणि तुमचे लेखन मूळ मुद्द्यावर केंद्रित राहते.
- 11
जेव्हा तुम्ही एका मोठ्या सिरीजला एक अवाढव्य काम न समजता, एकमेकांशी जोडलेले छोटे-छोटे प्रवास समजून लिहिता, तेव्हा ती पूर्ण करणे खूप सोपे होते.
पायरी-पायरीने नियोजन करा, तुमची पात्रे भक्कम ठेवा आणि प्रत्येक भागामध्ये वाचकांना कथा पुढे वाचण्याचे एक ठोस कारण नक्की द्या.
लेखनासाठी खूप-खूप शुभेच्छा!
Happy writing!
— Team Pratilipi
